श्रावण कुमार अयोध्येत राहणारा एक तरुण. आपल्या वृद्ध आई वडिलांना तीर्थयात्रा करण्यास कावड मध्ये बसवुन घेऊन जातो. त्यांना तहान लाग...

श्रावण बाळाची गोष्ट

श्रावण कुमार अयोध्येत राहणारा एक तरुण. आपल्या वृद्ध आई वडिलांना तीर्थयात्रा करण्यास कावड मध्ये बसवुन घेऊन जातो. त्यांना तहान लागली असे लक्षात येताच शरयू नदीकिनारी त्यांना थांबवुन घागरीने पाणी आणण्यास तो नदी जवळ जातो. घागर पाण्यात बुडताना जो आवाज येतो त्या आवाजाचा वेध घेऊन शब्दभेदी राजा दशरथ लपल्या जागेवरून बाण सोडतात जो श्रावण बाळाला मर्मस्थानी लागतो. राजा दशरथ जेव्हा बघायला येतात तेव्हा हा मर्मस्थानी लागलेला बाण काढायला श्रावण बाळाची विनंती त्यांना संभ्रमात टाकते. बाण काढला तर रक्तस्त्राव होऊन मृत्यू होईल, बाण नाही काढला तर मर्मस्थानी होणाऱ्या वेदनेने मृत्यू येईल. आणि ब्रह्म हत्येचे पातक शिरी आलेच आहे. परंतु त्या स्थितीत देखील श्रावण कुमार राजा दशरथाला म्हणतो मी ब्राह्मण नाही, माझी आई शूद्र आहे आणि माझे वडील वैश्य. परंतु या एका बाणाने तु केवळ माझीच नव्हे तर माझ्या वृद्ध अंध आई वडिलांची देखील हत्या केली आहेस. 

या पायवाटेने तू पुढे जा, ते दोन्ही वृद्ध तुला तिथे झाडाखाली आसरा घेऊन बसलेले दिसतील. त्यांची क्षमा माग. सांगितल्या प्रमाणे राजा दशरथ जेव्हा तिथे पोचला तेव्हा त्याने त्या दोन्ही वृद्धांना सर्व'कहाणी सांगितली आणि क्षमा मागितली. त्यांना श्रावण बाळाच्या मृतदेहाजवळ नेले असता त्यांचा शोक अनावर झाला व त्यांनी राजा दशरथाला तुलाही पुत्रशोक होईल असा शाप दिला. 

वाल्मिकी रामायणात हि गोष्ट हल्लीच्या काळा प्रमाणे पार्श्वभुमी, किंवा एक्सपोसिशन म्हणुन येत नाही. तर अयोध्या कांडात सर्ग ६३ आणि ६४ मध्ये श्री राम, जानकी आणि लक्ष्मण वनवासाला निघुन गेल्यावर राजा दशरथ राणी कौसल्येस कथन करतात. तसे पाहता श्रावण बाळाचे नाव वाल्मिकी रामायणात येत नाही, परंतु भारतीय साहित्यात श्रावण बाळ हे आई वडिलांच्या प्रति असेलल्या भक्ती चे प्रतीक म्हणुन सर्रास वापरले जाते. 

श्रावण बाळ आई वडिलांना घेऊन यात्रेस निघालेला हे छायाचित्र सांकरी जिल्हा उत्तरकाशी उत्तराखंड येथील समेश्वर या मंदिरातले. (जानेवारी २०२१)